Monday, May 11, 2020

आनंदाचे क्षण (परिवर्तन जळगांव उपक्रमांतर्गत)


आनंदाचे क्षण
आनंदाचे क्षण तसे लक्षात रहात नाहीत हल्ली.
बऱ्याचदा आयुष्य खाच खळग्यातून बाहेर आलेले असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेली दिव्ये तेवढी लक्षात राहतात. अर्थात त्यामधून मिळालेले यश हा आनंदाचा क्षण असू शकेल. पण तो निखळ आनंद नव्हे. ते जे काही असेल ते काहीतरी प्राप्तीचा ढेकर असेल बहुदा.
आनंदाची व्याख्या माझ्या दृष्टिकोनातून फार वेगळी आहे. आनंद असा जो निखळ असला पाहिजे. तो कशात मोजलाच जाऊ शकत नाही. कारण मोजमाप आले म्हणजे तुलना आली. आनंदाची तुलना करता येऊ शकते? आणि जर तुलना होणार असेल तर तो आनंद आहे का? म्हणजे असे बघा की मी आज कालच्यापेक्षा आज जास्ती आनंदी आहे. याचा अर्थ असाही होतो की तुम्ही काल आजच्यापेक्षा दुःखी होतात. म्हणजेच आनंदी नव्हता. म्हणून म्हटले की आनंद ज्या वेळी निखळ असेल तेव्हाच त्याची तुलना होणार नाही. कारण तो निर्लेप असेल, प्रांजळ असेल, निष्पाप असेल आणि  जमलाच तर निरंतर आणि चिरंतन असेल.
माझ्या आयुष्यात असाच एक आनंदाचा क्षण येऊन गेलेला आहे.
त्याचे वर्णन जसे जमेल तसे करण्याचा प्रयत्न करतो. प्रसंगचं इतका छान आहे की त्याचे वर्णन करताना सुद्धा मला आनंदाची प्रचिती येते.
तुमच्या आयुष्यात, स्वतःपेक्षा जास्त विश्वास दुसरा कुणी आपल्यावर दाखवला, असा कधी प्रसंग आलाय का हो?
पदव्युत्तर शिक्षण घेऊन मी नोकरीला अर्थातच तात्पुरत्या स्वरूपाच्या लागलो होतो. पहिली नोकरी बारामती येथे तुळजाराम चतुरचंद कॉलेजला केली. खूप चांगले महाविद्यालय आहे ते. आजही कोणतीही लाच न देता नोकरी मिळते तेथे. एक वर्ष काम संपवून मग मी रिसर्च असिस्टंट म्हणून जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालय येथे प्रा. डॉ. गौरी राणे यांच्याकडे काम करू लागलो. खानदेशातील मातीमधील कवकांचा अभ्यास असा तो विषय होता. मॅडम चा स्वभाव शिस्तप्रिय असल्याने मला माझ्या आयुष्यातील खरी शिस्त येथेच म्हणजे मु. जे. महाविद्यालयात लागली.
शिस्तप्रिय असल्या तरी मॅडम खूप प्रेमळ होत्या. आईची माया दिली त्यांनी. पण कामामध्ये मात्र त्यांना अजिबात कसूर चालत नसे. दिवसभर सूक्ष्मदर्शकाखाली मान धरून ती दुखत असे. पण ते सांगण्याची सोय नाही अशी काही परिस्थिती. पण समर्पण कशाला म्हणतात ते तिथे कळले. दिवसभर मातीचे नमुने गोळा करणे आणि त्यामधून कवकांचे विलागिकरण करणे, त्यांची प्रयोगशाळेत वाढ करणे असे काम चाले. एकटा जीव सदाशिव असल्याने माझी राहण्याची सोय मुलांच्या वसतिगृहात केली होती. पदवी चे  शिक्षण घेणारे विद्यार्थी त्या वसतिगृहात राहतं होते.
त्या वस्तीगृहाच्या एका खोलीत मला या त्रियींची भेट झाली. मनोज आणि आणखी तिघे. अर्थातच संध्याकाळी मी मोकळा असल्याने आणि भोजनालायत भोजन करताना यांची भेट झाली.
पाणी आणण्यासाठी म्हणून प्रत्येकाची पाळी लावण्यात ही मंडळी व्यस्त होती. त्यात एकेकाचे तर्क चालू होते. मी लांबून त्यांची मजा पाहत होतो. आणि प्रत्येकाने लावलेल्या तर्कावर विचार करत होतो. निष्णात वकिलाला शरण येण्यास भाग पाडतील असे तर्क एकेक जन लावत होता. कशासाठी तर पाणी आणायला लागू नये म्हणून.
 अशी ही ओळख नंतर मैत्रीमध्ये परिवर्तित झाली.
मग प्रत्येक वीकएंड चा चित्रपट आम्ही पाहू लागलो.
बऱ्याचदा पैसे नसल्याने आमच्यातील एकजण सिनेमा पाहून येत असे व त्याच्या रेटिंग नुसार बाकी जनता सिनेमा पाहण्यास जात असे.
मैत्रीची वीण घट्ट होत गेली. पण मैत्री किती घट्ट हे फक्त एखादा प्रसंगच ठरवू शकतो. तो प्रसंग संकट बनून मैत्रीची परीक्षण करत असतो. झालेही असेच काहीसे....
रविवार चा दिवस होता. त्यात जळगावच ऊन... एप्रिल महिन्याचे दिवस होते. कपडे ओले करून अंगावर घेऊन झोपले तरी अर्धा तास खूप होई कापडे वाळण्यासाठी.
भोजनालयात फारसे चांगले जेवण न मिळाल्याने कि सुटी असल्याकारणाने भूक लागली होती. आम्ही दुपारी काहीतरी खायला आणू असे म्हणून बाहेर पडलो.
थोड्या अंतरावर आम्हांला अननस विकणारा एक हातगाडी वाला भेटला. या एवढ्या उन्हात अजून काही भेटण्याची शक्यता फार कमी असल्याने आम्ही जे भेटेल ते पदरात पाडून घेण्याचे ठरवले.
आणि साधारण तीस की चाळीस रुपये किंमत ठरवून आम्ही ते अननस घेऊन वसतिगृहात आलो.
काहीतरी जुगाड करून आम्ही ते अननस कापले आणि काय हे? अननस चक्क सडके निघाले. आता मात्र राग अनावर होत चालला होता. एक तर उन्हातान्हात गेलो चाळीस रुपयेही गेले आणि सडके अननस. माझा राग जरा जास्तच अनावर झाला. मी ते अननस घेऊन थेट त्या ठेल्यावर गेलो आणि त्याच्याशी भांडू लागलो.
एव्हाना मनोज आणि बाकी मंडळी माझ्या मागोमाग आली होती.
पण तो फेरीवाला काही ऐकत नव्हता. मी त्याला पोलिसात जाण्याची धमकी दिली. तरी तो ऐकेना. अचानक माझ्यातला क्रांतिकारक जागा झाला आणि मी हा अन्याय सहन करणार नाही वगैरे विचारांनी प्रेरित होऊन मी माझ्या देशबांधवांना (माझ्या मागे आलेल्या मुलांना) माझ्याबरोबर पोलीस ठाण्यात येण्याचे आवाहन केले. नेमके इथेच अर्धे बांधव माघारी पळाले (चाळीस रुपयाचे अननस साठी काय पोलिसात जायचे वगैरे विचार असतील त्यांच्या मनात बहुदा). पण मनोजसह अजून काही जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती की! मग ते सडलेले अननस घेऊन आम्ही पोलीस स्टेशनात निघालो. पोलीस स्टेशन येईस्तोवर राहिलेली जनता कधी गळून गेली कळलेच नाही. पोलीस ठाण्याच्या दारात उभा होतो मागे वळून पाहतो तर फक्त मनोज एकटाच माझ्या मागे.
मी तसाच आवंढा गिळत पोलीस ठाण्यात गेलो आणि डायरेक्ट सिनिअर पोलीस निरीक्षक यांना भेटलो. मनोजसह माझीही पोलीस ठाण्यात जाण्याची पहिलीच वेळ होती. सिनेमासारखं पोलीस आपल्याला दाद देणार नाही असे वाटले होतें पण निरिक्षक साहेबांनी अपुलकीने विचारणा करून प्रकार समजून घेतला व त्या फळ विक्रेत्यास बोलावले. फळ विक्रेता घाबरतच आला व अदबीने उभा राहिला. विचारणा झाल्यावर तो सांगू लागला, साहेब मी काय अननस मध्ये शिरून पायलंय व्हय. असे खराब निघालेलं अननस बदलून देत बसलू तर पोरबाळांना काय खाऊ घालू.
एव्हाना माझाही राग शांत झाला होता. मी पण प्रसंग जास्त न ताणता त्यावर पडदा टाकणे योग्य समजले.
मात्र या प्रसंगाने एक खूप मोठा आनंद माझ्या आयुष्यात आला. एक सच्चा मित्र मिळण्याचा आनंद. जेव्हा कुणीच तुमच्या बाजूने उभे राहायला धजावत नाही तेव्हा तुमच्या सोबत असलेल्या माणसांची संख्या मोजा. ते खरे मित्र. हा निखळ आनंदाचा ठेवा मला मनोज च्या रूपाने भेटला आणि तो निरंतर आणि चिरंतन पणे तसाच खळाळत आहे या पेक्षा मोठा आनंद काय असू शकतो. किशोर सुलभ मतांच्या जाळ्यात न अडकता तोही प्रथमच  मजसवे पोलीस ठाण्यात आला होता. तोही खूप घाबरला होता पण तो लटलटत का असेना माझ्या बाजूला उभा होता. आपल्या पेक्षा जास्त आपल्यावर कुणीतरी विश्वास ठेवतय हि फीलिंग लईच भारी असते. आणि त्यातून जो आत्मविश्वास वाढतो त्याची मोजदाद कोणत्याच परिमाणा मध्ये करणे शक्य नाही. म्हणूनही तो आनंद मोठा.  हाच खरा आनंदाचा  क्षण मी समजतो.
अशा या आनंदाची तुलना होऊ शकत नाही. हा काल पेक्षा अधिक किंवा उद्या पेक्षा कमी असे काहीच होऊ शकत नाही म्हणून हा आनंद आहे निर्भेळ, निखळ, निरंतर लक्षात राहणारा आणि आयुष्यात अजून एक पाठ शिकवणारा.

परिवर्तन जळगावचे आभार त्यांनी मला माझ्याच आयुष्याची आनंदाची सफर घडवलीत म्हणून. 

धन्यवाद..

मी आपणास आवाहन करतो,
परिवर्तनच्या विविध उपक्रमासाठी सबस्क्राईब करा परिवर्तनचं युट्युब चॅनेल

https://www.youtube.comll/channel/UCvmsOWIXxS-lIuzpwRw1JNQ

https://www.facebook.com/parivartan.jalgaon/


Thursday, May 11, 2017

वाढदिवस साहेबांचा

वाढदिवस साहेबांचा .....
साहेब नावाची कवच कुंडले जे जन्मताच घेऊन आले आणि यथार्थपणे ती मिरवली सुद्धा. कवचकुंडलांची नशा न कर्णाला होती न आमच्या सरांना आहे..... दातृत्व हा गुण त्यांनीही जोपासला पण त्यांनी त्याचा कधी गर्व होऊ दिला नाही. खरतर दातृत्वाची नशा कर्णाला होती या नश्येमध्येच तो आपली कवचकुंडले हरवून बसला.... प्रत्येक गोष्टीत समतोल कसा साधावा हि पहिली शिकवण दिली आमच्या सरांनी. त्या आमच्या सरांचा (माझ्या मोठ्या भावाचा) आज वाढदिवस .....
बालपणापासून गरिबी, खडतर जीवन काय असतंय याचे जवळून अनुभव घेतलेले, संपूर्ण आयुष्य शिस्तप्रिय पण तितकेच दिलखुलास पणे जगणारे, आदर्श शिक्षक, मार्गदर्शक, कर्तृत्ववान, धाडसी, निर्णयक्षम, उत्साह निर्मिणारा, आत्मविश्वासपूर्ण, मेहनती, बुद्धिमान, व्यक्तिमत्व, उत्तम प्रशासक, कर्त्तव्य कठोर, पित्याच्या मायेने विद्यार्थ्यांमध्ये सुपरिचित असे माझे सर...
जर का शिस्तभंग झाला तर जमदग्नीचा अवतार धारण करणारे (त्यातही आपुलकी, कर्तव्यकठोरता आहेच). आधी केले मग सांगितले, या संतवचनावर विश्वास असणारे आणि आयुष्यभर त्याचे अनुकरण करणारे, सहृदयी असे माझे सर.... प्रत्येक माणूस चांगलाच असतो, पण प्रत्येकालाच वेळेवर योग्य निर्णय घेता येतील असे नाही, मग माणसे चुकतात, त्यांना जर का समजावून सांगितले आणि सुधारण्याची संधी दिली तर माणसे सुधारतात अशी सिद्धता अनेक प्रयोगांती सरांनी शेकडो वेळा करून दाखवली आहे.
समोरच्या व्यक्तीमधील चांगल्या गुणांसाठी स्पर्धा करा, वाईट गुणांसाठी नाही. (उदा. बर्याच वेळा आमच्या सहकारी वर्गातून हा सूर येतो कि अमुक अमुक असे असे करतो पण सरांना ते दिसत नाही का? खरतर हा सुद्धा हट्टी लडिवाळ प्रश्न असतो) पण सरांनी नेहमी सांगावे कि तुलना वाईट गोष्टी मध्ये नको. अमुक अमुक हे सुद्धा चांगले करतो त्याबाबतीत  त्याच्याबरोबर तुलना करा. आपले व्यक्तिमत्त्व त्यातून घडेल अशी शिकवण नेहमी सरांनी दिली.
एक शिस्तप्रिय पण प्रेमळ पिता म्हणून त्यांची ओळख मला आहे. स्वताच्या मुलाकडून झालेल्या चुकीबद्दल लायब्ररीच्या कोपर्यावर त्याच्यावर कोपलेले सर मी जवळून पाहिलेत. खूप मारले त्यावेळी त्यांनी प्रसादला. मुलगाही त्यांचाच..... लेकाराने चकार शब्द काढला नाही तोंडातून. शेवटी मातोश्री (सरांच्या सुविद्या पत्नी ) ना मध्यस्थी करावी लागली....पण तोच प्रसाद पुण्याला इंजिनीरिंग साठी गेल्यावर  पुण्याहून परतताना न जेवता घरी येऊन उपाशीच झोपणारा भावनाप्रधान पिताही मी जवळून पहिलाय.
प्रशासनामध्ये काम करताना एक काटेरी मुकुट धारण करून सतत हसतमुख राहणार व्यक्तिमत्व मी जवळून अनुभवलंय. रोजच्या व्यवहारात असणारे हजारो प्रश्नांचे शिवधनुष्य लीलया तोलनारे पण त्याचा मागमूसही चेहऱ्यावर न दिसू देणारे साहेब मी त्यांच्या भूमिकेतून पाहिलेत....
सहकार्यांच्या हजारो चुका माफ करत मोठ्या मनाने पुन्हा त्यांना योग्य सल्ला (सल्ला असा ज्याच्यामध्ये कधीच स्वार्थ नसतो) देणारे साहेब मी पाहिलेत.
तिन्ही ऋतू बारा काळ ज्यांनी फक्त आणि फक्त संस्थेच्या हिताचा विचार केला आणि अल्पावधीत संस्थेला समाजात एक उंची प्राप्त करून दिली. यामागचे कष्ट, सातत्य, निष्काम कर्मयोग मी जवळून अनुभवलंय म्हणून साहेब तुम्ही आमच्यासाठी वंदनीय आणि अनुकरणीय आहात.
गुणग्राहकता हा असाच एक गुण. समोरच्या व्यक्तीमधील गुण हेरून त्याला माझ्या संस्थेसाठी मी कसा उपयोगात आणू शकेल ( येथेही निस्वार्थ वृत्ती ) याचाच विचार नेहमी करून त्याचे उपयोजन करण्याचा गुण सरांमध्ये आहे म्हणून गुणग्राहकतेला अंडरलाइन करणे क्रमप्राप्त ठरते.
या सर्वांमध्ये त्यांच्या सुविद्या पत्नी (आमच्यासाठी गुरुमाउली) यांनीही त्यांची सावलीप्रमाणे साथ दिलीय हे सुद्धा विशेष नमूद करावे वाटते.
अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आज प्रकटदिन....... साहेब, गुरु, मोठा भाऊ  अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझे आयुष्य फुलवले, प्रकाशमान केले....तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा.....
कदाचित मला एकाच वेळी तुमच्यासमोर हे सर्व बोलायला जमले नसते म्हणून हा लेखन प्रपंच. माझ्या शब्दसुमन रुपी शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोहोचतील अशा अपेक्षेसह.....
(ता.क.- हे सर्व मी आंग्लभाषेत लिहू शकलो असतो पण त्यातील सर्वच भावना व्यक्त होतील का? हि शंका होती म्हणून क्षमस्व.......)
 सदैव आपलाच,

डॉ. अविनाश लांडगे 

Tuesday, September 13, 2016

एक मराठा लाख मराठा

एक मराठा लाख मराठा

कोपर्डी, अहमदनगर घटनेपासून समाजमनातील वळवळीचे रुपांतर चळवळीत कधी झाले कोणालाच कळले नाही. खरे कारण पाहता हि खदखद फार कधीपासून लोकांच्या मनात होती, ती उफाळूण येण्यास कोपर्डी घटना हे एक तात्कालिक कारण झाले, हे जरी खरे असले तरी न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद या मुकमोर्च्यांना  लाभत आहे. जरी कोपर्डी प्रकरणाचा मुखवटा घेऊन निघालेला हा शांती मोर्चा असला तरी त्यामागे अनेक असंतोष घेऊन निघालेलाल हा समुदाय आहे. बळीराजाची झालेली अवहेलना हे त्यामागचे एक मोठे कारण आहे. सततचे दुष्काळ आणि नापिकीमुळे बेजार झालेला शेतकरी वर्ग शासनावर प्रचंड नाराज आहे. शेतीमालाचे उतरलेले भाव, मिळणाऱ्या अपुर्या सुविधा यामुळे शेतकरी बांधवामध्ये असंतोष खदखदत होताच. जगाच्या पाठीवर असा कोणता व्यवसाय आहे ज्यामध्ये भांडवलदार किंवा मालक स्वताच्या खिशातून पैसे टाकून माल विकतो. मात्र केविलवाण्या बळीराजाची परिस्थिती वाईट झाली आहे. या असंतोषला वाट मिळाली आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी माता भगिनींनी या मोर्च्यामध्ये सहभाग नोंदवला. त्यांचीच उपस्थिती लक्षणीय आहे. या माध्यमातून तरी न्याय मिळेल, काही परिवर्तन घडेल अशी भाबडी अशा या मंडळींमध्ये आहे.
अत्यंत सनदशीर मार्गाने निघालेल्या या मोर्च्याचा अर्थ व परिणाम बरेच बुद्धिवादी लोक काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र विषयाचा आवाका इतका मोठा आहे कि त्यातून कोणत्याच निष्कर्षापर्यंत कुणीच पोहोचू शकलेले नाही. अँञिसिटी रद्द करा किंवा दुरुस्त्या करा हा एवढाच अजेंडा या मोर्च्याच्या मागे नक्कीच नाहीये.
या मोर्च्याच्या गुण दोषांकडे पहिले असता पुढील बाबींचा विचार करता येईल.
या मोर्च्याची वैशिष्टे (गुण):
१.       फक्त एकमेकांच्या हाकेला ओ दिल्याप्रमाणे एकत्र आलेला हा आपला समाज खरच अभिनंदनाचा विषय आहे. कित्येक वर्ष खितपत पडलेला समाज चांगल्या मुद्द्यांवर पुन्हा एक होऊ पाहतोय.
२.      १८५७ नंतरचा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदलासाठी समाज एकत्र येताना दिसतोय.
३.      सनदशीर मार्गाने मुकमोर्च्या हे वैशिष्ट्ये. कोणतीही घोषणा नाही, भित्तीपत्रक नाही, कोणत्याही पुढार्याचे नाव नाही, तरीही मोर्च्याचे शिस्तबद्ध नियोजन हा सुसंस्कृत मनाचा अविष्कार पहावयास मिळत आहे. भारतीय समाजमनावर हा एक संस्कार रुजवताना दिसतोय. या मोर्च्याचे म्हणूनच सर्व स्तरातून स्वागत होताना दिसतेय.
४.      केवळ मराठा हि जात नाही तर शेतकरी बांधव समाजातील सर्व जाती जमातीचे लोक यामध्ये उपस्थिती दाखवत आहेत.
५.     समाजातील सर्व समाजबांधवांनी या पद्धतीच्या मोर्च्याचे स्वागत केले. कोणत्याही मालमत्तेचे नुकसान नाही तसेच कोणाला कसलाही त्रास होणार याची विशेष काळजी घेतलेली दिसतेय. सर्व जाती धर्माचे तरुण बांधव या मोर्च्यामध्ये उत्स्पूर्तपणे स्वयंसेवक म्हणून मदत करताना दिसत आहेत.
६.      कोणत्याही गोष्टीची लालूच नाही अगदी घरातून शिदोरी बांधून माता भगिनींची मोर्च्यास उपस्थिती दिसत आहे.
वरील सर्व कारणांमुळे मूक मोर्च्या यशस्वी होताना दिसत असला तरी यातील काही त्रुटी प्रामुख्याने मांडाव्या वाटतात.
त्रुटी:
१.       मराठा क्रांती मोर्चाला कोणतीही विशिष्ट दिशा नाही. नक्की काय हवय याबद्दल संदिग्धता आहे, त्यामुळे फक्त शक्तीप्रदर्शन एवढेच यामधून सध्या होताना दिसत आहे.
२.      एकूणच आतापर्यंत झालेल्या विश्वासघातामुळे मराठा समाज कोणत्याही एका नेत्याला या क्रांतीमोर्च्याचा मुखवटा किंवा नेतृत्व देण्यास तयार नाही. आजपर्यंत सत्ता भोगलेल्या नेत्यांनीही शेतकऱ्यांच्या (मराठा समाजाच्या) तोंडाला कशी पानेच पुसली आहेत याची उजळणी मोर्च्याचा प्रचार करताना दिसत आहे. तरीही हाच सर्वात मोठा दोष म्हणावा लागेल.
३.      भरभक्कम नेतृत्व नसल्याने हा क्रांतीमोर्च्या हवेतच विरून तर जाणार नाही ना याची भीती वाटते. १८५७ साली झालेल्या उठावाप्रमाणे मराठ्यांनी एकजूट दाखवली खरी पण त्याप्रमाणेच दिशाहीन गर्दी आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे या मोर्च्याचे पुढे काय हा खरा प्रश्न आहे. वेडात मराठे वीर दौडले सात हे खरे असले तरी त्यांच्याकडे एक विशिष्ट उद्धेश होता, आज खरा अजेंडा काय याबद्दल संदिग्धता आहे. या सर्व गर्दीचा चेहरा कोण, नक्की कोणाशी चर्चा करायची? हा मोठा प्रश्न आहे.
असो, मराठ्यांनी  (माझ्या समाजबांधवांनी) दाखवलेली हि अभूतपूर्व एकी नक्कीच काहीतरी आशादायी चित्र उभे करून जाईल यात शंका नाही. विख्रलेला समज पुन्हा एकत्र आलाय हे फार मोठे निष्पन्न म्हणता येईल
सामाजिक प्रसारमाध्यमानी समाजात आलेली जागरुकता खरच वाखाणण्याजोगी आहे. हि समाजमनाची मशागत सतत चालू राहो.
साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा मराठा एकत्र आलाय बदलाचे वारे आणू इच्छित आहे. सुशासन, सुराज्य प्रस्थापित करू इच्छित आहे. 
आई जगदंबे, आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश दे, आशीर्वाद दे .........
डॉं. अविनाश लांडगे
(एक मराठा लाख मराठा)
मो. ८८८८२२१५८६



Saturday, February 6, 2016

बाजीराव ...... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)

बाजीराव ...... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)
मागील वर्षी दिवाळीच्या सुटीत गावी गेलो होतो.हीच एक वेळ असते जेव्हा आम्ही सर्व मित्र एकत्र येतो, भेटतो, आणि पुन्हा बालपणात भटकून येतो. माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्याबद्दल आपल्या मित्राला जोपर्यंत अभिमान वाटत नाही तोपर्यंत स्वतःला भरून पावल्यासारखे होत नाही हे खरय. म्हणजे आपल्या यशाबद्दलची मजा जोपर्यंत आपल्या मित्राच्या नजरेत झळकत नाही तोपर्यंत जगण्याची आणि जिंकण्याची नशा अधुरीच.
दिवाळीच्या सुटीत गावी गेल्यावर बालपणीच्या सर्व मित्रांनी एकत्र यायचं. दिवाळीच्या दुसर्या दिवशी गेट टूगेदर  करण्याची प्रथा आम्ही सर्वांनी पाडलीय. एकत्र भेटल्यावर वर्षभरातील सुख, दुःख मौज, मजा अचीवमेटस याबद्दल गप्पा होतात. येथे येताना आम्ही एक नियम कटाक्षाने पाळलाय...... आपली जे काही सध्य स्थितीतील लेबल्स आहेत ती सर्व घरी ठेऊन यायची. आपले ते जुनेच आन्या, धन्या, योग्या, आव्या याच ओळखीमध्ये भेटायचे आपण. आमच्यामध्ये बरेच जन आता डॉंक्टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य, वकील, झालेत. तर काहींनी स्वतःहून शेती व्यवसाय पत्करलाय. प्रत्येक वेळी बोलण्याची सुरुवात तुझ बरंय बाबा..... काही टेंशन नाही, नाही तर आमचे आज पाणी आहे तर हवामान ठीक नाही, हवामान ठीक आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर मजूर मिळत नाही,.... अशा तक्रार वजा गोष्टींनी होते. आम्हाला सगळ्यांना हे आता अंगवळणी पडलय.
मग हळूच योग्या सुरुवात करतो.... काय रे धनु किती वेळ काम करतोस तू शेतात.... काम असे एक काही नसते रे ... पडेल ते करायचे बाकी काय इति धनु.
हो तरी पण साधारण किती तास काम करतोस दिवसातून तू? योगेश विचारतो.
सगळे स्वनियंत्रित केलेय मी बटन दाबायचे कामे ठेवलीत. धनु सांगू लागतो. तरी पण सकाळ दोन तास संध्याकाळी दोन तास.... बस्स. आणि हो सीजन ला पळापळ होते ती वेगळी. वरतून लोड शेडींग मुळे रात्रीचे उठावे लागते.
योगेश एव्हाना कोणत्या दिशेने निघालाय हे आमच्या घराबाहेर, गावाबाहेर, पडलेल्या  मित्रांच्या लक्षात आलेले असते. किती उत्पन्न काढतोस रे वर्षभरात? योगेश पुन्हा विचारतो.
सीजन सापडला तर ७-८ लाख कुठेच नाही गेले. धनु फुशारकीने सांगतो.
अरे वा! मग मजा कोणाची ते सांग रे भाऊ योग्या विचारतो पुन्हा.
बघ आता आमची कहाणी ऐक. वर्षभर काम काम आणि काम फक्त. वर्षातून फक्त ८ रजा. वरून टार्गेट दिलेले. नाही झाले तर पगार कट. मध्येच रात्रपाळी लावलेली. कधी फोन करून बोलावतील भरवसा नाही. आणि वर्षाचे उत्पन्न ५-६ लाखाच्या पुढे नाही.  
तूच सांग आता कोण सुखी. अरे नोकरी चा अर्थच असा होतो कि नोकर बनून राहणे, कुणाचीतरी चाकरी करणे. कधी कधी वाटते की नको हे सगळे. तुझी तीच आमची गोष्ट. ‘जगण्याची गोष्ट सगळ्यांची सारखीच.’
अरे सगळ्यात दुःखी कोण ची काय स्पर्धा करताय? आपण सुखी कसे हे सांगा... सुख मानण्यात असते. सुख काही विकत घेण्याची गोष्ट नाही कि जास्त पैसा असला म्हणजे आपण सुखी असा त्याचा अर्थ होत नाही. आन्या उवाच. 
असाच वाद-संवाद चालू होता मागील सुटीत. इतक्यात राम्या धावत आला आणि धापा टाकत सांगू लागला.
अरे ऐकल का? काहीतरी सिरिअस घडले असणार हे एव्हाना आमच्या लक्षात आले होते. सर्वजन राम्याकडे बघत होते.
राम्या सांगू लागला. अरे, ‘बाजीराव’ने पोईजन घेतले. दवाखान्यात नेलंय त्याला... सर्वजन हळळले.. ‘अरेरे काय करून बसला हा...’
सर्वजन त्याला बघण्यासाठी हॉंस्पिटलला जाऊयात म्हणून सगळे उठले. गाडीत बसल्या बसल्या माझ्या डोळ्यासमोर बाजीराव च्या आयुष्याचा कालपट सरकू लागला.... बाजीराव ला मी सगळ्यात जास्त ओळखत होतो. प्रत्येक सुटीत आमची भेट होत होती. बाजीराव सर्व इतिवृत्त मला सांगत असे.
बाजीरावला मी ओळखत होतो तो त्याच्या शांत स्वभावामुळे. कधी कोणाल उद्धटपणे न बोलणारा अतिशय नम्र असा हा बाजीराव.
सुरुवातीच्या काळात शेतीला पाणी नसल्यामुळे बाजीरावने दुसर्याच्या शेतावर रोजंदारीने जाऊन उदरनिर्वाह केला होता. या कामी आई वडिलांची चांगली साथ त्याला लाभली. लग्न जरा लवकरच झाले. त्यामुळे तो, बायको, आई आणि वडिल अशी चार माणसे कामावर जात असत. रोजंदारीतून मिळणारे उत्पन्न अधिक कोरडवाहू शेतीतून मिळणारे उत्पन्न यांच्या मदतीने त्याने स्वतःची विहीरे खोदण्याचे ठरवले. स्वतःचे पाणी असल्याशिवाय आपल्याला बागायती शेती करणे शक्य नाही याची कल्पना त्याला होती. म्हणून त्याने हा निर्णय घेतला. आधीच कोरडवाहू भाग, विहिरीला पाणी लागणे तसे देवदूर्लभच पण बघू काही चमत्कार होतो का? शिवाय जरी पाणी लागले तरी पावसाळा, हिवाळा ऋतूत जरी पाणी मिळेल तरी आहे ती शेती चांगली बहरेल. उन्हाळा हिवाळा कांदे जरी लावले तरी भरपूर झाले असा विचार करून कमाला सुरुवात केली. निरागस माणसाच्या मागे देव नेहमी उभा राहतो. प्रामाणिक कष्टांची किंमत मिळतेच मिळते होळीच्या दिवशी पाणी लागले विहिरीला. ‘काय आनंद झाला  होता बाजीरावला!’. पाण्याची पूजा करून संपूर्ण मळ्याला  जेवण दिले होते बाजीरावने. होळीच्या दरम्यान पाणी लागले याचा अर्थ असाही होता कि उन्हाळ्यात सुद्धा पिण्यापुरते पाणी मिळणार होते. नाहीतर बायकोला दोन कि. मी. वरून डोक्यावर पाणी आणावे लागे. आता आपले चांगले दिवस सुरु झाले. आपल्याला श्रीमंतीचे दिवस जिवंतपणी पाहायला मिळणार म्हणून आईवडिलांच्या आनंदाला  पारावार उरला नाही. संपूर्ण आयुष्य त्यांनी दारिद्र्यातच घालवले होते. ज्या शेतकर्यांकडे पाणी मुबलक आहे तो कधी अपयशी होत नाही हे त्यांनी उदाहरणाने पाहिले होते.
तुटपुंज्या उत्पन्नाचा भोपळा फुटण्यासाठी पहिल्याच वर्षी घेतलेल्या भोपळा पिकाने चांगली साथ दिली.
या वर्षी बाजीरावाने ८० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले होते. विहीर खोदण्यासाठी चा आलेला खर्च वसूल झाला होता. शेती करण्यासाठी स्वतःचे अवजारे असणे गरजेचे  म्हणून त्याने एक छोटासा ‌‌‌‍‍टँक्टर विकत घेतला. घरच्या शेतीची मशागत करून दुसरेही काम त्याला मिळू लागले आणि उत्पन्नात अजून भर पडली.
दोन तीन वर्षातच बाजीरावची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत आली होती. निसर्गाची साथ आणि त्याची ढोर मेहनत यांचा परिपाक म्हणून गाडी रुळावर येण्यास अजिबात वेळ लागला नाही. जेव्हा कधी आम्ही गावाकडे जात असू तेव्हा बाजीराव आवर्जून घरी बोलावून चहा पाजत असे. थोड्या कालावधीत केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी जगात एक तरी व्यक्ती पाहिजेच. हे केलेले कौतुक माणसाला अजून उर्जा देते, हुरूप देते”, असे माझे मत आहे. ‘हा हुरूप समोर असलेला कष्टाचा डोंगर चुटकी सरशी अर्धा करून टाकते.
तीन वर्षापूर्वी जेव्हा बाजीराव भेटला तेव्हा बाजीरावाने बंगल्याचे काम सुरु करायचे  ठरवले होते. पण काही कारणांनी त्याने तो रद्द केला. या वर्षी शेतात बटाट्याचे लागवड करण्याचे बाजीरावाने ठरवले होते. अजूनही कांदा, बटाटा , लसून,आल यांच्याकडे नगदी पिके म्हणूनच पहिले जाते. ठरल्याप्रमाणे बाजीरावने बटाट्याचे बियाणे शोधून आणून गादीवाफ्यावर बटाट्याची लागवड करण्याचे ठरवले. गावातील हा पहिलाच प्रयोग होता.आई वडील बायकोची साथ हतीच रात्र दिवस कष्ट करून बटाट्याचे पिक जोमाने वाढू लागले. पाणी देणे आणि एखाद दुसरा फवारा देण्याशिवाय विशेष काही काम आता राहिले नव्हते. बटाट्यातून चांगले उत्पन्न मिळणार याची खात्री बाजीरावला होती. ह्या वेळेला  आईला आणि बायकोला एक एक दागिना बनवून देऊ असा मनोमन इरादा त्याने केला.
दुपारच्या वेळी विशेष काही काम नसल्याने गावातील पारावर जाऊन बसण्याचे सत्र बाजीरावने सुरु केले. तेथे गावातील काही मंडळी पत्ते खेळत बसत. १३ पानांची रमी हा त्यांचा आवडता खेळ ते खेळत असत. बाजीरावही काही काम नाही म्हणून कुतूहलाने त्या खेळन्याकडे बघत बसे. पत्ते खेळणार्यार्यांमध्ये नानू नावाचा बाजीरावच्या वयाचा पट्टीचा खेळाडू होता. शक्यतो तो कधी हरत नसे. फार काही कमी नसे पण गमवावे लागत नसे असे काही पाने फिरवायचा तो, कि हरलेली बाजी हातात चांगली पाने नसतानाही जिंकत असे. हे सर्व पाहून बाजीरावला मौज वाटे. म्हणून बाजीराव नानूच्या पत्त्यांकडे विशेष लक्ष देऊन बसत असे. बाजीराव नेहमी नानूच्या मागे बसून पत्त्यांकडे बघत असे. नानुही मधूनमधून येथे हे पान पाहिजे हे पान आले तर असे पत्ते फिरवल्यास डाव पूर्ण करता येईल अशी चर्चा बाजीरावाबरोबर करी यातून या दोघांची चांगली मैत्री झाली. पण बाजीराव कधीही पत्ते खेळला नाही.
संध्याकाळच्या वेळी कुठेतरी अंडाभूर्जीची गाडी बघून दोघे भुर्जी खात असत. नंतर नंतर नानूच्या आग्रहास्तव बाजीराव एक दोनदा दारूही प्यायला. दोन महिने वेगाने सरकले दरम्यान बाजीरावची नानूच्या मित्रांबरोबर गट्टी जमली होती. नानुचे मित्र बाजीरावच्या स्वभावाची खूप प्रशंसा करत असत. चार सहा वेळा त्यांनी बाजीरावला पार्टीही दिली होती. बटाट्याचे पिक काढणीला आले होते. गादीवाफे नांगराने फोडून बटाटे गोळा करण्याचे काम आई, वडील व बाजीरावच्या बायकोने उन्हातान्हात केले.
यंदा बटाटे पुण्याला विकू. पुण्याच्या मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो असे नानुने बाजीरावला सुचवले होते. मागचा पुढचा विचार न करता नानू काय आपल्याला खोटा थोडेच सांगणार म्हणून बाजीरावने पिकअप मध्ये सर्व बटाटे भरले. आतापर्यंत नानू आणि नानुचे दोन तीन मित्र यांनी बाजीरावचा चांगलाच विश्वास संपादन केला होता. बटाटे विकण्यासाठी निघाल्यावर बाजीरावने नानुला फोन करून येतोस का पुण्याला म्हणून विचारले. नानुने हि दोन मित्रांना फोन करून बोलावून घेतले आणि सर्व जण बाजीरावचे  बटाटे विकण्यासाठी पुण्याला गेले. सगळ्या मार्केटमध्ये बाजीरावचा बटाटा एक नंबर दराने विकला गेला. ७०-८० हजार रुपये बाजीराव ला मिळाले होते. चार सहा महिन्याच्या कष्टांचे चीज झाले असे बाजीराव ला वाटले. सर्व मित्रांनी बाजीराव चे अब्भिनंदन केले. पार्टी तो बनती है...... असे म्हनून बाजीराव ला पार्टीसाठी गळ घातली. अर्थातच आपल्या जिगरी दोस्तांसाठी नाही तर कोणासाठी... असे म्हणून बाजीराव तयार झाला. साधारण चाकण  च्या पुढे निघाल्यावर, एका बियर बार जवळ गाड्या थांबल्या. ए आज जरा चांगला ब्रांड मागवू असे म्हणून बाजीराव ने ब्ल्याक डॉग व्हिस्की ची ओर्डर दिली. आणि हो येताना जरा चिकन चिल्ली, मटन मोगलाई वगैरे चकण्यासाठी घेऊन ये..... बाजीराव ने वेटर ला फर्मावले. सर्व मित्र आज बाजीरावाच्या कोद्कौतुकाचे गोडवे गाण्यात गुंग होते. बाजीरावलाही आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते. दोन तीन पेग नंतर दारू ने मेंदूचा ताबा घेतला. प्रत्येकाला मी फार महत्वाचे बोलतोय आणि बाकीच्यांनी फक्त माझेच ऐकले पाहिजे असे वाटू लागले. तर मध्येच कोणी तरी  भाऊ....  तू एकदम बरोबर बोलतोय असे म्हणून त्याला प्रोत्साहन देत होता. विषय नक्की कोणता सुरु आहे हेच कोणाला कळत नव्हते आणि बोलत तर सर्वजन होते. तेही फार महत्वाच्या विषयावर..... थोड्या वेळाने फक्त फुशार्कीच्या गोष्टी सुरु झाल्या. प्रत्येक जन मी काय काय भीम पराक्रम केलेत यावर बोलू लागला आणि पेग वर पेग रीचवू लागला. आपण कशी शून्यातून सुरुवात केली.... आणि परिस्थिती बदलवली हाच केंद्रबिंदू प्रत्येकाच्या संभाषणाचा होता. यथेच्च पिऊन झाल्यावर जेवता जेवता नारायणगाव जवळ एक संगीतबारी आहे असे सुचवले. संगीतबारी हा विषय तसा बाजीराव साठी नवीन होता..... आता हे काय असतंय..... बाजीराव नशेत बरळला. बाकीच्यांनी संगीत बारी म्हणजे काय हे याला माहित नाही... हा अजून अंड्यातून बाहेर आला नाही... म्हणून हसून त्याची टर उडवली. बाजीराव पूर्णपणे नशेत होता. त्याला त्याच्यावर हसून केलेला त्याचा अपमान सहन झाला नाही..... ए नान्या.... कॅह्ल आज संगीतबारी पहायची, असे खडसावले. सगळे टुंग झालेले होते. कोणाला कशाची शुद्ध नाही.... मग काय ठरले बारीला जायचे!
बारीजवळ उतरल्यावर नान्या बाजीराव ला म्हणाला ए बाज्या डे दहा हजार रुपये चाल.... दहा हजार रुपये? कशाला दहा हजार रुपये? बाजीराव ने डुलत डुलत विचारले.
अरे मग काय बारी फुकट असती काय? का तो सिनेमा आहे? दोनशे रुपयात तिकीट काढून बसायला. चल दे  पैसे नाही तर चल परत. नान्या ने निर्वाणीचे सुनावले. च्यायला खिशात नाही अना आणि मला बाजीराव म्हणानान्याने बाकीच्यांना गाडीत बसायला सांगितले.
आता मात्र हा प्रतीष्ठेचा प्रश्न होऊन बसला होता बाजीराव च्या दृष्टीने. खिशात पैसा डोक्यात नशा अजून काय होणे अपेक्षित होते. मग काय बाजीराव ने दहा हजार रुपये भिरकावले नाण्याच्या दिशेने. आणि ए नान्या हे घे पैसे चल आपण तुझ्यासारखे भिकारचोट नाय बाजीराव नशेत बरळत होता. सर्वजन आत घुसले. बाजीराव ने प्रथमच हि बरी बघितली होती, पाहत होता. मराठी सिनेमा मध्ये जसे निळू फुले तक्क्याला पाठ लावून बसत असे व समोर नाच गाण्याचा कार्यक्रम चालू असे, प्रचलित भाषेत त्याला मुजरा म्हणतात. काहीसा असाच प्रक्रार तेथे चालू होता. भिंतीच्या कडेला मांडलेल्या गुबगुबीत गादयांवर बाजीराव आणि बाकी मंडळी बसली. खोलीमध्ये उंची अत्तराचा वास दरवळत होता आणि डोक्यामध्ये भिनत होता. डोक्यावर दारूने कब्जा केलेला होताच, वरून समोर नाचगाणे सुरु झाल्यावर मंडळींना स्वतःवर ताबा राहिला नाही. विक्षिप्त चाळे करत सर्वजन बारीची मजा घेत होते. आजूबाजूला तीच परीस्थिती होती. बेधुंद करणार वातावरण. प्रत्येकाला नशेत असताना स्वर्गात आल्यासारखे वाटत होते. स्वर्गात अप्सरा नाचतात म्हणे तसाच काहीसा प्रकार येथे सुरु होता यालाच स्वर्गसुख म्हणतात का? असे प्रश्न पडावे असा तो धुंद करणारा प्रकार. कुणी कुणी १०० च्या नोटा उधळत होते, ती नर्तकी मग हवेतच चुंबन देत असे,  कुणी ओठावर ठेवून त्या नाचणाऱ्या बाईला उचलायला लावत होते. आणि तिने ती नोट उचलल्यावर खुनशी नजरेने बाकीच्यांकडे मिशीवर पिळ देत पाहत होते. मग कुणी शंभर च्या ५ नोटंचा पंखा बनवून नजरेने त्या बाईला मांडीवर बसायला सांगत होते. असा सर्व एकंदर प्रकार तिथे चालला होता. हळूहळू बाजीराव मधला बाजीराव जागा झाला आणि बाजीराव ने नोटा उधळण्यास सुरुवात केली. आतापर्यंत बाजीराव आणि नान्या सोडला तर सार्वजन पेंगू लागले होते. नान्याने बाजीराव ला आता बस कर म्हणून सांगितले. पण बाजीराव काही ऐकायला तयार नव्हते. अजून एक लावणी झालीच पाहिजे म्हणून बाजीराव ने नोटांची गद्दी त्या बाईकडे फेकली. असे करता करता पहाटेचे चार वाजले. नान्याने सर्व मित्रांना उचलून गाडीत बसवले बाजीराव ला फ्रंट सीटवर बसवून गाडी घेऊन घरी घेऊन आला. सकाळी जेव्हा नाश उतरली तेव्हा सगळ्यांचे डोके दुखत होते. रात्री आपण काय केले याचा थोडासा अंदाज बाजीराव ला आला . बाजीराव ने खिसे चाचपले. सर्वच्या सर्व पैसे बाजीराव ने रात्री पार्टीत आणि बारीमध्ये उधळले होते. बाजीरावच्या डोक्यामध्ये मुंग्या आल्या. काय केले आपण?  बटाट्यासाठी अनालेलेल खते बी बियानेचे पैसे सुद्धा आपण  देणे बाकी आहेत. आईवडिलांच्या बाय्कोपोरांच्या सहा महिन्याच्या कष्टाच्या बदल्यात साधा खाऊ आपण त्यांना आणू शकलो नाही. आता आईबाबांना कोणत्या तोंडाने सांगायचे आपला बटाटा, तुम्ही व बायकोने कष्टाने पिकवलेला बटाटा पुण्याच्या मार्केट मध्ये एक नंबर दराने विकला गेला. आपण पिकवलेला बटाटा सर्वोत्कुष्ट होता. उन्हातान्हात राबणाऱ्या आपल्या मुलांसाठी एक बिस्किटचा पुडा आणताना दहंदा विचार करणारे आपण ८० हजार रुपये अशा प्रकारे उधळले. या वर्षी तूला चांगली साडी घेईल असे त्याने बायकोला वचन दिले होते. आणि बायकोने हि तुम्हाला एक लिनेन चा शर्ट घेऊ असे सांगितले होते. आई आणि बायकोला एक एक दागिना करून द्यायचे असेही त्याने मनोमन ठरवले होते. किती कष्ट उपसतात बिचार्या पण त्याची दखल कोणालाच नसते. बाजीराव पूर्णपणे निराश झाला. घरात चिडचिड करू लागला.
एकदा झालेली चूक सुधारण्यासाठी सुद्धा नियतीने बाजीरावला संधी दिली नाही. त्या वर्षी असलेले कर्ज जसेच्या तसे राहिले. पुढील वर्षासाठीच्या पिक उभारण्यासाठी बाजीराव ने  पुन्हा कर्ज घेतले. आणि यावेळी मात्र त्याच्या मागे साडेसातीचा फेरा लागला. नापिकी, दुष्काळ, निसर्गाचे सम विषम चक्र यामध्ये बाजीराव असा काही गुरफटला कि पूर्ण अर्थचक्र कोलमडून पडल.
‘व्याजाला झोप नसते असे म्हणतात, घेतलेल्या कर्जाचे व्याज फुगत गेले. कर्ज फेडण्यासाठी मोठ्या हौसेने घेतलेले टँक्टर विकावे लागले. यातून अधिकच निराशा पदरी पडली.
चाकणच्या पार्टीमध्ये मौजमजा करू लागलेले मित्र त्याला बघून रस्ता बदलू लागली. त्याच्याशी बोलणे टाळू लागली. खरा तर अशा वेळी मित्राच्या सहानुभूतीपूर्वक शब्दांची खूप गरज असते माणसाला. यातून नवीन उभारी घेता येऊ शकते. पण त्याचीच सगळीकडे वानवा होती. पार्टीत / बारीत मजा करणाऱ्या मित्रांनीच नंतर बाजीरावाने पार्टीत कसा ‘माज’ केला याबद्दल गावभर बोलू लागले. इकडून तिकडून बाजीरावाच्या कानावर या चर्चा येत मग मात्र बाजीरावला अश्रू अनावर होत. फार मोठी चूक झाली आपल्या हातून, फार मोठे पाप घडले अशा विवंचनेत बाजीराव स्वतःला कोसत राहिला, दोष देत राहिला. आधीच शांत असलेला बाजीराव फारसा कुणाशीच बोलत नसे मात्र आतल्या आत धुमसत राहिला. त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता.
वर्षभर उन्हातान्हात काम करणाऱ्या आईवडिलांना बायकोला साधे अंगभर कपडे घेऊ शकत नाही आपण. पोरांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकायचे आपले स्वप्न अधुरेच राहणार का? खरे तर तो पैसा त्यांच्या कष्टाचा होता. आपण फार चुकीचे वागलो अशा विचारांनी बाजीराव आणखीच खंगत गेला.
दोन चार वर्षापासून पाणी पाउस नसल्याने विहीरही आटली होती. गावात कुणालाच पाणी नसल्याने मजुरीची कामे मिळणेही दुरापस्त झाले होते. अशात राहिलेले कर्ज फेडण्यासाठी बाजीराव मागे तगादा सुरु झाला. आता मात्र बाजीरावाच्या पायाखालची जमीन सरकली  होती. आणि या सर्व नैराश्यामध्ये बाजीरावाने घरात शिल्लक असलेले कीटकनाषक प्राशन  केले. आणि शेतात जाऊन झोपून राहिला. पण जसजसे किटकानाषक अंगात भिनू लागले तसतसा त्रास व मरणयातना बाजीरावाला होऊ लागल्या आणि तो तडफडू लागला. आणि घराकडे पळत सुटला शेजारपाजार्यानी त्याला उचलले व हॉस्पिटलला घेऊन गेले. बातमी कळल्यावर आम्हीही हॉस्पिटलला निघालो होतो. गाडी हॉस्पिटलजवळ येऊन थांबली विजू म्हणाला अवि उतर हॉस्पिटल आले. तेव्हा कुठे मी भानावर आलो आणि गाडीतून उतरून होस्पिटलच्या पायर्या चढू लागलो. होस्पितालच्या पायर्यांवर बाजीरावच्या वडिलांना डोक्याला हात लावून बसलेले पहिले आणि काळीज कळवले. बाजीरावच्या आईने मला पाहून मोठ्याने हंबरडा फोडला. डोळ्यात तरळणारे अश्रू रुमालाने टिपले आणि एका शेतकर्याचीच आत्महत्या का? हा विषय डोक्यात गर्दी करू लागला.

(५-२-२०१६)